वा रे एमव्हीए तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल !
वा रे एमव्हीए तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल !
मुंबई, दि. २१ डिसेंबर :
पेट्रोल-डिझेलचे भाव केंद्राने ५ आणि १० रुपये कमी केला. त्यानंतर २७ राज्यांनी व्हॅट कमी करून दर कमी केले. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, ज्यांनी हे दर कमी केले नाहीत. विदेशी मद्यावरचा कर ५० टक्के कमी करण्याचे पाप या सरकारने केले आहे. त्यामुळे हे सरकार नक्की कुणासाठी काम करते? पेट्रोलचे भाव कमी करत नाही, पण दारूचे दर करते. त्यामुळे इंदिराजींच्या काळातलाच नारा पुन्हा द्यावा लागेल की ‘व्वा रे एमव्हीए तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल’, असा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर तोफ डागली.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. जुने गृहमंत्री अटकेत आहेत. गृहखाते कोण चालवते समजत नाही. बदल्या कशा होतात माहिती नाही. वसुलीचे टार्गेट घेऊन आज अनेक अधिकारी काम करतात आणि खासगीत सांगतात की आम्ही इतके पैसे देऊन आलो आहोत आणि वसुली तर त्याची करावीच लागेल. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये अवैध रेती, दारू, सट्टा, सर्व प्रकारची अवैध कामे, सुपारी घेऊन जमिनी लाटण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांवरील अत्याचार वाढलेत. आरोग्य परीक्षेतला घोळ, म्हाडाच्या परीक्षेतला घोळ, टीईटीतला घोळ आहे. परीक्षांचे रॅकेट मोठ्या प्रमाणात चाललेले आहे. या रॅकेटचाही पर्दाफाश अधिवेशनात करणार आहोत.
शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे. सुलतानी पद्धतीने वसुलीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. केंद्राने दिलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवू शकले नाहीत. फक्त जीआर काढले पण त्यावर कारवाई केली नाही. विम्याच्या बाबतीत मोठा घोटाळाच सरकारने केला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशीलता सरकारमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यावर आम्ही सभागृहात मुद्दे मांडू, असेही फडणवीस म्हणाले.
