‘त्या’ २७ टक्के जागांवर १८ जानेवारीला मतदान

0
124

‘त्या’ २७ टक्के जागांवर १८ जानेवारीला मतदान…

ओबीसींच्या २७ टक्के जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक..

मुंबई, दि. १७ डिसेंबर:

ओबीसी आरक्षणाच्या वादात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात या राज्य सरकारच्या मागणीला राज्य निवडणूक आयोगाने विचारत घेतलेले नाही. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय संबंधित २७ टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारीत तारीख जाहीर केली आहे.

पंचायत निवडणुकांमधील ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर या ठरलेल्या दिवशीच मतदान होत आहे परंतु ज्या जागांवर ओबीसी आरक्षण होते त्या २७ टक्के जागा आता अनारक्षित म्हणून जाहीर करण्यात आल्या असून त्या जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर सर्व जागांसाठीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान पुढे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर महानगरपालिकांतील ४ रिक्त पदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबरच्या आदेशानुसार आता मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल असे मदान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *