संरक्षण दल प्रमुख बिपीन रावतसह १४ जण हेलिकॉप्टर अपघात ठार
संरक्षण दल प्रमुख बिपीन रावतसह १४ जण हेलिकॉप्टर अपघात ठार.
कुन्नूर, जि. ८ डिसेंबर:
देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हा अपघात झाला. रावत त्यांच्या पत्नी व इतर अधिकारी यांच्यासह १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.
बिपीन रावत हे सकाळी दिल्ली येथून विशेष विमानाने सुलूर येथे पोहचले. तिथे ११.३४ वाजता पोहचल्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते वेलिंग्टनकडे निघाले होते. वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी ते चालले होते. मात्र, ११.४८ वाजता सुलूर येथून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपघाताची माहिती दिली व त्यानंतर रावत यांच्या निवास्थानी भेट दिली.
IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरले जाते.
बिपिन रावत यांनी १ जानेवारी २०२० रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद स्वीकारले. याआधी ते लष्कर प्रमुख होते. रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. बिपिन रावत यांना लष्करातील अत्युच्च कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक तसेच विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
