ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही.
ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही.
‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव.
मुंबई, दि.२८ डिसेंबर :
केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता असून कोरोनामुळे केंद्र सरकार २०२१ ची जनगणना सुरू करत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारला ती करण्याचा आग्रह धरत आहे. ही जनगणना होईपर्यंत आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे अशी मागणी करत ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी म्हणाले.
महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, छत्तीसगढ राज्यात बहुजन समाजातील नेतृत्व भूपेश बघेल यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदावर काम करत आहे. त्यामुळे गरिबांची कामं होत आहेत. लोकांसाठी जे लढतात ते चिरकाल स्मरणात राहतात त्यामुळे तुमचं नेतृत्व तुम्हीच निर्माण करा असे त्यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळाले. ज्यांनी आपले आयुष्य आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी व्यथित केले त्यांना आपण विसरता कामा नये. सगळीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे पुतळे उभारण्यात यावे.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नागेश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रित्येश गवळी यांनी केले.
