सुरक्षा यंत्रणा सरकारच्या वेठीला, मुंबईकर वाऱ्यावर !
सुरक्षा यंत्रणा सरकारच्या वेठीला, मुंबईकर वाऱ्यावर !
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम ठाकरे सरकारने रखडवली
मुंबई, दि. २६ नोव्हेंबर
मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून गुंडाळून ठाकरे सरकारने मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात आणली आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
मुंबईच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे बसविण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हाती घेतला होता. ही मोहीम पूर्णत्वास येत असताना सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारच्या काळात मात्र थंडावली. आज अनेक सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्तच असल्याने घरफोड्या, दरोडे, रस्त्यावरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात फडणवीस सरकारने साडेपाच हजार टीव्ही कॅमेरे लावून पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यात साडेपाच हजार कॅमेरे लावायचे होते. त्यापैकी जेमतेम चार पाचशे कॅमेरे लावण्यात आले. पाचशे कोटींचा निधी यासाठी लागणार होता. तो निधी कोणत्या झारीतील शुक्राचार्याने अडविला याचे उत्तर मिळायला हवे, असे उपाध्ये म्हणाले.
राजकारणापायी जनतेच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून राज्यात अस्थिरता माजविणाऱ्या प्रवृत्तींना बळ मिळत आहे. मात्र, २६ नोव्हेंबरच्या त्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या अनेक सुरक्षा उपाययोजना आजही निकामी किंवा कमकुवत झाल्या असून केंद्रीय यंत्रणांनी वारंवार इशारे दिल्यानंतरही त्या सक्षम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. २६ नोव्हेंबरच्या त्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोट्यवधी रुपये खर्चून मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झालेल्या गस्ती बोटींपैकी अनेक बोटी आज नादुरुस्त असून धूळ खात पडल्या आहेत. किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली रडार यंत्रणाही निकामी झाल्याची माहिती मिळत असून त्याच्या दुरुस्तीबाबत सरकार गंभीर नाही. रडार यंत्रणेतील ८४ नियंत्रण केंद्रांपैकी एकही केंद्र आज कार्यान्वित नसल्याने सागरी सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.
