उल्हासनगरमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करा
उल्हासनगरमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करा.
मुंबई, दि. 22 नोव्हेंबर :
उल्हासनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, यावर उपाय म्हणून शहरातील नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मनपा आयुक्तांना दिलेले आहेत.
उल्हासनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेने शहरातील कचरा व्यवस्थापन समस्येची सद्यस्थिती सर्वांसमोर मांडली. शहरात प्रत्येक दिवशी 360 मेट्रिक टन घनकचरा तयार होतो. यापैकी ओला कचरा सुमारे 200 मेट्रिक टन तर सुका कचरा 106 मेट्रिक टन निर्माण होतो. हा कचरा साईट नंबर 399, खडी मशीन जवळील पडीत खदान, गायकवाड पाडा, उल्हासनगर 5 येथील खदानीत टाकण्यात येतो.
या कचऱ्याचे वर्गीकरण ओला आणि सुक्या कचऱ्यात करण्यात येत नसल्याने कचऱ्याची दुर्गंधी वाढू लागली होती. त्यात ही तिन्ही डम्पिंग ग्राउंड शहराच्या मध्यभागी असल्याने नागरिकांनी ही डम्पिंग ग्राउंड तत्काळ हलवण्याची मागणी केली होती. यावर उपाय म्हणून अंबरनाथ तालुक्यातील मौजे उसाटणे 30 एकर जमिनीवर नवीन डम्पिंग ग्राउंड उभारणे प्रस्तावित होते.
तत्पूर्वी ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मनपाचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट होत आसल्याने या प्रश्नावर तोडगा काढणे शक्य झाले. तोच उपाय उल्हासनगर महानगरपालिकेने देखील आपल्या हद्दीत राबवावा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिले.
हा उपाय शहरात राबनणे ही आता काळाची गरज बनली असून कचऱ्याचे वर्गीकरण करूनच त्यानंतर त्याची विल्हेवाट लावावी लागेल अशी भूमिका कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली.
त्यामुळे आता उल्हासनगर मधील नागरिकांना घरच्या घरी कचरा व्यवस्थापन करावे लागणार आहे.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उल्हासनगरचे मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगर शहराचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, बिट्टू भाई, महापौर लीलाबाई आशान हे उपस्थित होते.
