शाळेच्या दाखल्यात समीर वानखेडे ‘मुस्लीम’ !!
शाळेच्या दाखल्याने समीर वानखेडेच्या अडचणी आणखी वाढल्या !
मुंबई, दि. १८ नोव्हेंबर :
एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लीम हा वाद एका महत्वाच्या टप्प्यावर आला आहे. समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म ‘मुस्लीम’ असल्याचे दिसत आहे. या दाखल्यामुळे समीर वानखेडे यांचा धर्म नक्की कोणता हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
समीर वानखेडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली दस्ताऐवज बदलले. तेथील रजिस्टर देखील गहाळ केले. पण त्यांना हे माहीत नव्हते की महापालिकेने ते दस्तावेज स्कॅन करुन ठेवले होते. आज ते महानगरपालिकेचा संगणकीय दाखला दाखवत आहेत. आम्ही महापालिकेची मुळ कागदपत्रे कोर्टासमोर ठेवली आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
क्रांती रेडकर यांनी मात्र ट्विट करत मलिक यांची माहिती चुकीची आहे हे सांगताना समीर वानखेडे यांच्या मूळ कागदपत्रांमध्ये दुरुस्ती केलेली कागदपत्रे प्रसिद्ध केली. वानखेडे हे मूळ हिंदू-महारच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका दुष्ट हेतूने समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी अर्धवट माहिती प्रसिद्ध केली जात आहे. त्या कागदपत्रांमध्ये काही चुका होत्या. त्यानंतर १९८९ मध्ये ज्ञानदेव वानखेडे यांनी अधिकृत कागदपत्रं सादर करून त्या चुका दुरुस्त करून घेतल्या. वानखेडे यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वीकारली होती अशी माहिती क्रांती रेडकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.