नीरज गुंडेच्या माध्यमातून फडणवीसांकडून वसुली !
नीरज गुंडेच्या माध्यमातून फडणवीसांकडून वसुली !
मुंबई, दि. १ ऑक्टोबर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सचिन वाझे आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, भाजपाशी संबंधित असलेला नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस यांचा दूत आहे. युती सरकारच्या काळात जेव्हा-केव्हा शिवसेना, भाजपचे संबंध तणावपूर्ण व्हायचे. तेव्हा हा गुंडे उद्धव ठाकरे यांना भेटायचा. गुंडे याला फडणवीसांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात, निवासस्थानात थेट प्रवेश असायचा. सर्व अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये तो रोखठोक जायचा. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे? कधी होणार, हे तो ठरवायचा. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर त्याचं नियंत्रण होतं. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची वसुली व्हायची. देवेंद्र फडणवीस जेव्हा-केव्हा नवी मुंबई किंवा पुण्याला जायचे तेव्हा नीरज गुंडे यांच्याच घरी जायचे.
राज्यात मविआचं सरकार आल्यानंतर हा नीरज गुंडे हा ईडी, एनसीबी, सीबीआयच्या, आयकर विभागाच्या कार्यालयात फिरताना दिसत आहे. निरपराध नागरिकांना अडकवायचे आणि मुंबई, गोव्यात ड्रग्जचा खेळ सुरू ठेवायचा यासाठीच समीर वानखेडेला एनसीबीमध्ये आणले आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.
समीर वानखेडे मागील १४ वर्षांपासून मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या बदल्या करण्यात देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळवत लोकांना फसवण्यासाठीच एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा म्हणून समीर वानखेडे यांना आणण्यात आले. काशिफ खान सारख्या मोठ्या ड्रग पेडलरला सोडून देण्यात येते. ऋषभ सचदेवा, आमीर फर्नीचरवाला, प्रतिक गाबा यांना सोडून देण्यात येते. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो.
