एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर तोडगा काढू
एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर तोडगा काढू
मुंबई, दि 19 ऑक्टोबर :
आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
विविध परवान्यांच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नुतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीटामागे 25 रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नये, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.
असोसिएशनच्या वतीने नितीन दातार, निमेश सोमय्या, पूना एक्झिबिटर असोसिएशनचे सदानंद मोहोळ, अशोक मोहोळ, प्रकाश चाफळकर यांनी आपल्या मागण्या सादर केल्या.
