आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत
आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत
मुंबई, 14 ऑक्टोबर :
आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपाध्ये म्हणाले की, केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीने ९ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेप्रमाणे हा साठा उचलावा असे कळविले होते. भुसावळ, कोराडी, चंद्रपूर येथील औष्णिक उर्जा निर्मिती प्रकल्पांच्या व्यवस्थापकांना कोल इंडियाने पत्र पाठवून कोळशाच्या उपलब्ध साठ्याची माहिती कळवली होती. या पत्राला महाजेनकोने २१ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे कळविले होते.
एकीकडे लॉकडाऊन काळात मागणी वाढल्याने वीज बिलांमध्ये वाढ झाल्याचे उर्जामंत्री सांगत होते. दुसरीकडे राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे केंद्र सरकारला कळविले जात होते. यातून आघाडी सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. ऊर्जा खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्यातील जनतेला वीज टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या बाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.
