संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ !
संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ !
मुंबई, दि. 5 ऑक्टोबर :
अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कालच राज्यातील शाळा सुरु झाल्या आणि आज आपला इथे वर्ग भरला… आजही आपण विद्यार्थीच आहोत. मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ म्हणून मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो.
अर्थसंकल्पातील बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्याची तसेच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमकं बोलण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात याची जाणीव उपस्थितांना करून दिली. ठाकरे म्हणाले की, आपण ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करतो ते मतदार विधानमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. मतदारसंघाचे किती प्रश्न सभागृहात मांडतात याकडे मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे थोर परंपरा लाभलेल्या या सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असताना सभागृहाचे कामकाज समजून घेवून आपल्याला मिळालेली ही उच्च परंपरा कशी जपता येईल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
राज्यावर सतत येणाऱ्या आपत्तींचा उल्लेख करून या सर्व आपत्तीकाळात आपण आपत्तीग्रस्तांना तात्काळ वाढीव स्वरूपात मदत करत असलो तरी ही नुकसानभरपाई नाही. कारण आपण त्यांचे नुकसान कधीही भरून देऊ शकत नाही. पण त्यांना धीर देण्याची गरज आहे. या आपत्तींमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
