मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेणार

0
IMG_20210927_175130

मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेणार

मुंबई, २७ सप्टेंबर :
कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे असे सांगताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले.

राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोविडचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तथापि या कालावधीत विभागाने कोविडनंतर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत, हे करीत असताना नवीन पर्यटन स्थळेही विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून ‘महा’राष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईल, असा विश्वास व्यक्त करून सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहील, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी विभागाच्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाराष्ट्र ही विविध संधींची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास होत आहे. या संदर्भात जागृती निर्माण करत पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (UNWTO) ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

आजच्या कार्यक्रमादरम्यान मुंबई उच्च न्यायालय व मुंबई विद्यापीठाच्या इमारतींची ऐतिहासिक वारसा सफर या उपक्रमाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानुसार, आता शनिवारी व रविवारी मुंबई उच्च न्यायालय तर सार्वजनिक सुट्या व सर्व रविवारी मुंबई विद्यापीठाच्या वास्तूत पर्यटकांना प्रवेश खुला केला जाणार आहे. ही संपूर्ण सहल टूर गाईड असोसिएशन प्रमाणित मार्गदर्शकांच्या सहकार्याने पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *