मुंबईतील कांदळवनावर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर

0
20210907_110951

मुंबईतील कांदळवनावर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर

मुंबई, दि. 7 सप्टेंबर :
कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  याच बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कांदळवन वाचवण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्यात यावी अशा सूचनाही दिल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेले निसर्ग क्षेत्रे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी असेही ते म्हणाले.

नियामक मंडळाच्या बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव विकास खारगे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी, महाराष्ट्र कांदळवन आणि सांगरी जैविविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

एमएमआरडीएने एमटीएचएल प्रकल्पांतर्गत कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी  दिला  असून त्यातून  भक्ती पार्क, वडाळा येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.  यासाठी निविदेद्वारे काम करण्यासाठी सर्वात कमी दर असलेल्या मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *