संघटनात्मक पदांसाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार !
संघटनात्मक पदांसाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार !
मुंबई, १० ऑगस्ट :
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री संतोष यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकास कामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठऱला, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे केवळ संघटनात्मक आणि विकास कामांच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी गेले होते. राज्यात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विषय नव्हता. संघटनात्मक पदांसाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार आहेत. दरवर्षी संसदेच्या एका अधिवेशनात राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीत जावे आणि पक्षाच्या खासदारांशी राज्यातील प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत विचारविनिमय करावा, अशी पक्षाची परंपरा आहे. कोरोनामुळे ही परंपरा खंडीत झाली होती. आता पुन्हा त्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटनेतील निवडक नेत्यांचे शिष्टमंडळ तीन दिवस दिल्ली भेटीवर गेले होते.
या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संघटनमंत्र्यांना भेटण्यासोबतच राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्री तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची भेट झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाच्या निमित्ताने सर्व खासदारांची भेट झाली. या भोजन समारंभात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व पंकजा मुंडे सहभागी झाले. या विचारविनिमयातून राज्यातील विकासकामांच्या दृष्टीने बरीच उपयुक्त माहिती मिळाली. आता नियमितपणे पक्षाचे राज्यातील पदाधिकारी दिल्लीत जाऊन राज्याच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती आपण केंद्रीय नेतृत्वाला दिली. ठाकरे यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे आपण केंद्रीय नेतृत्वाला सांगितले.
