पोलीसांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे !

0
IMG_20210810_101403

पोलीसांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे !

नाशिक, दि. 10 ऑगस्ट :
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,  पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री  आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सीमा हिरे, सरोज अहिरे, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक संजय कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, अकॅडमीच्या संचालक अश्वती दोर्जे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांना बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षण घेताना मानसिक स्वास्थ्य कायम राखणेदेखील महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पोलीस अकॅडमीच्या निसर्गरम्य परिसरात उत्तम सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अशा वातावरणात प्रशिक्षण घेऊन बाहेर जाणारे अधिकारी राज्यातील माताभगिनींचे रक्षण करणार आहेत. अकादमीच्या गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने येथील सुविधा व प्रशिक्षणाची माहिती घेण्यासाठी पुन्हा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, माझे राज्य पुढे कसे जाईल हा विचार करणे ही संघभावना आहे. महाराष्ट्र पोलिस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला आहे. आपल्या पोलिसांमध्येही क्रीडा राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. त्यांच्या जिद्दीला दिशा देणे, सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. क्रीडा स्पर्धेतील यशासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीबाबत पोलिसांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. शिस्तबद्ध संयोजनाने आणि झालेल्या कामाने आपण भरावरून गेलो, कामाच्या कौतुकासाठी शब्द नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अकादमीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *