मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकी !
मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकी !
नवी दिल्ली, दि. ३ ऑगस्ट
मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यात काँग्रेस ला यश आले असून राहुल गांधी यांनी बोलावलेल्या ब्रेकफास्ट चर्चेसाठी तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी आणि इतर अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. बसपा आणि आम आदमी पक्षाचे नेते मात्र गैरहजर होते. महागाई व पेगॅसस हेरगिरी प्रकरणी मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी ही बैठक झाली. आपली एकी हेच आपले बळ आहे असे म्हणत मोदी विरोधात एकत्र लढा देण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

राहुल गांधी म्हणाले, माझ्या दृष्टीकोनातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक असणे आणि हीच आपली ताकद आहे. जेवढे लोक एकत्र आवाज उठवतील तेवढा हा आवाज बुलंद होईल आणि तो दाबून टाकणे भाजपा-संघासाठी आणखी अवघड होईल.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून मोदी सरकारची कोंडी करण्यात विरोधकांना यश आले आहे. पेगॅसस प्रकरणावरून मोदी सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत.
