डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार..

0
ककक

मुंबई, दि. १४ जुलै २०२० :

जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या‍ विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

देशाचे माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा “आधुनिक भगीरथ” हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. तो वाचला गेला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. आज प्रकाशित झालेल्या ‘लोकराज्य’च्या स्व शंकरराव चव्हाण विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते.

स्वातंत्र्याची जपणूक करतांना आणि त्याचे स्वराज्यात रुपांतर करतांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे स्व. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व होते. सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण कडक शिस्तीचे होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तर म्हटले जाई. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरणक करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरु करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजच्या युगात असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगात आई-वडिलांसारखा गुरु नाही. त्यांच्या मुशीत आणि कडक शिस्तीत घडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मंत्रिमंडळात माझे सहकारी म्हणून काम करतात याचा आनंद आहे. स्व. चव्हाण यांना घरातही शिस्त लागायची, दंगा आवडायचा नाही, असं हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होते. मी शाळेत असतांना शंकररावांना पाहिलं होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्या.

डॉ. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *