राज्यपाल म्हणाले, ‘तब्येत ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही’!
मुंबई, दि. १२ जुलै २०२०
‘आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आहे असे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत परंतु रविवारी प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी बातम्या आल्या आहेत त्या निराधार आहेत. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
राज्यपालांनी जरी त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे स्षष्ट केले असले तरी कोरोना राजभवनवर धडकला असून १६ कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर राजभवनवरील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी जे. जे. हॉस्पिटल येथे घेण्यात आली , त्यातील १४ जण पॉझीटीव्ह आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
