मराठा आरक्षणाला हरताळ फासण्याचे पाप भाजपचेच!
मराठा आरक्षणाला हरताळ फासण्याचे पाप भाजपचेच!
कांगावाखोर भाजपा नेते पुन्हा तोंडावर आपटले.
मुंबई, दि. 2 जुलै:
मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करुनही भाजपा जनतेची दिशाभूल करत मोदी सरकारची पाठराखण व फडणवीस सरकारने केलेली फसवणूक लपवत होती. आता सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्याने फडणवीस सरकारचा कायदा अवैध पद्धतीने केलेला होता व त्यातून मराठा आरक्षणाला हरताळ फासण्याचे पाप भाजपचेच आहे, हे स्पष्ट झाले, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत पुढे म्हणाले की, आता आरक्षण देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असल्याने मोदी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. याकरिता तातडीने पावले उचलावीत. त्याबरोबरच इंदिरा साहनी प्रकरणात निर्धारित केलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे, त्याबाबतही घटनादुरुस्ती करावी. राज्यांना अधिकार देण्यासाठी १०२ व्या घटनादुरुस्तीत आणखी दुरुस्ती करावी लागेल. पण आता आरक्षण केंद्र सरकार थेट देऊ शकत आहे.
१०२ व्या घटनादुरुस्ती नंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने हा घोळ घालून मराठा आरक्षण अडचणीत आणले असा आम्ही आरोप केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मात्र राज्यांचे अधिकार गेले नाहीत असा कांगावा केला होता आता ते उघडे आहेत. मराठा आरक्षणाविरोधात भाजपाचा पदाधिकारी व संघ कार्यकर्त्यांना Save Merit Save Nation संस्थेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात पाठविणाऱ्या भाजपाने भूमिका स्पष्ट करावी.
