तिवरे धरणग्रस्तांच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.

0
IMG_20210607_180119

तिवरे धरणग्रस्तांच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.

मुंबई दि. 2 जुलै :
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण झाले, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे. यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धी विनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की , आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबियांविषयी मनात सहवेदना आहे तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे असे म्हणता येईल. मी हे दान करणाऱ्या भाविकांना आणि मंदिर न्यासाला त्यांच्या या मदतीसाठी धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही यावेळी आवर्जुन उल्लेख केला.

तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देतांना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी  सावधगिरी बाळगण्याच्या सुचना आपण दिल्या आहेत. वित्त हानी भरून काढता येते परंतू मनुष्य हानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *