corona 222

मुंबई, दि. ११ जुलै २०२०

धारावीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आव्हानात्मक काम होते. हे आव्हान स्थानिक धारावीकर, महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारले, राज्य शासनाने या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांना बळ देण्याचे काम केले असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इथली ८० टक्के लोकसंख्या ४५० सामूहिक शौचालयांचा वापर करते. बहुतेक लोकसंख्या बाहेरच्या अन्नावर अवलंबून आहे.  १० बाय १० च्या घरात इथे आठ ते दहा लोक राहतात. शारीरिक अंतर पाळणे, रुग्णाला होम क्वारंटाईन करणे शक्य नव्हते. अशावेळी ‘चेस द व्हायरस’ उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली.

३.५ लाख लोकांचे स्क्रिनिंग

या मोहिमेत ४७ हजार ५०० घरे डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ॲक्टिव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर्स यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली.

१४ हजार ९७० लोकांचे मोबाईल व्हॅन द्वारे स्कॅनिंग करण्यात  आले. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्व्हे करण्यात आला.  १४ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन  करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.

खासगी डॉक्टरांचा अमूल्य सहभाग…

खासगी सार्वजनिक भागीदारीतून उच्च जोखमीचे झोन निश्चित करून खाजगी प्रॅक्टिशनर्सच्या सहकार्याने मिशन मोडन स्वरूपात काम करण्यात आले. पालिकेच्या वैद्यकीय उपचार केंद्राशिवाय २४ खासगी डॉक्टर यासाठी पुढे आले. त्यांना महापालिकेने सर्व वैयक्तिक सुरक्षा साधनांचा पुरवठा केला. टेस्ट किट्स, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, मुखवटे, हातमोजे (हॅण्ड ग्लोव्हज)  उपलब्ध करून देऊन घरोघर जाऊन तपासणी सुरु केली. सर्व चिकित्सकांनी आपले दवाखाने सुरु ठेवले. संशयितांना बीएमसी रुग्णालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. महापालिकेने सर्व खासगी दवाखान्यांची स्वच्छता करून सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. साई हॉस्पिटल, प्रभात नर्सिंग होम, फॅमिली केअर सारखी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली. या भागात जागेची कमी असल्याने होम क्वारंटाईन चा विचार न करता संस्थात्मक क्वारंटाईन वर भर दिला गेला. यासाठी शाळा, मंगल कार्यालये, स्पोर्टस कॉम्प्लेक्स उपयोगात आणले गेले. नाश्ता, दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी कम्युनिटी किचनची संकल्पना राबविली गेली. २४/७ पद्धतीने नर्स, डॉक्टर आणि वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली. मल्टिव्हिटॅमिन्स आणि औषध पुरवठा सुरळित ठेवण्यात आला. १४ दिवसांच्या अल्प काळात २०० खाटांचे ऑक्सीजन पुरवठ्यासह व्यवस्था असलेले  सुसज्ज रुग्णालय उभारले गेले. फक्त क्रिटीकल रुग्णांना धारावीबाहेर नेण्यात आले तर ९० टक्के रुग्णांवर धारावीतील वैद्यकीय उपचार केंद्रातच उपचार करण्यात आले.  हाय रिस्क झोनची निवड करण्यात आली.  कोविड योद्धा म्हणून सामाजिक नेतृत्व या भागात  नियुक्त केले गेले.

अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटे

कंटेनमेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्याची २५ हजार किराणा किट तर २१ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.याशिवाय आमदार, खासदार आणि नगरसेवकांनीही या भागात मोफत अन्नधान्याचे वितरण केले.

या सर्वांचा परिणाम म्हणून धारावीत कोरोनावर मात करणे शक्य झाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *