विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार सक्रीय !
विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार सक्रीय !
मुंबई दि. २१ जून :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांना एकत्र आणून आघाडी उभी करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणीची दिल्लीत मंगळवारी बैठक होत असून त्यानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद पवार करणार असल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानीही भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
