काँग्रेसला मजबूत करणे हाच राहुल गांधींच्या वाढदिवसाचा खरा संकल्प.
काँग्रेसला मजबूत करणे हाच राहुल गांधींच्या वाढदिवसाचा खरा संकल्प.
मुंबई, दि. १९ जून :
काँग्रेस नेते खा. राहुल गाधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसने केलेल्या विविध कार्यक्रमातून एक चांगला संदेश देशभरात गेला असून कोरोनामुळे संकटात असलेल्या गरजू, गरिब लोकांना रेशन, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप करून काँग्रेस पक्षाचे प्राधान्य हे प्रथम जनहित आहे हे दाखवून दिले आहे. कोरोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हातळल्याने देश २० वर्ष मागे गेला आणि सामान्य लोकांचे संसार उघड्यावर आणले. डॉ. मनमोहनसिंह, राहुल गांधी यांनी केलेल्या सुचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. या मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा मुकाबला करत महाराष्ट्रासह देशभर काँग्रेस पक्षाला मजबूत करणे हाच राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा खरा संकल्प ठरेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.
खा. राहुलजी गांधींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विविध कार्यक्रम राबवून संकल्प दिन साजरा केला तसेच काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनच्या नुतनीकरणानंतरचा उद्घाटन सोहळा पार पडला, यावेळी पाटील बोलत होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, मागील ७ वर्षापासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असून ते मनमानी पद्धतीने काम करत आहे. राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी अनेकदा सुचना केल्या. त्या सुचना किती हितकारक होत्या त्याची जाणीव आता होत आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोनाचे संकट यावर त्यांनी विधायक सुचना केल्या पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले नाही त्याचा परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका मोदींनी स्विकारली असती तर मोठी हानी टळली असती. देशाला आता दूरदृष्टी असलेला, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा, सर्वसमावेशक अशा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि देशातील तरूणवर्गही राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छित आहे. राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत त्यांच्या या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे.
