कोल्हापूरातील रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर भर द्या.

0
IMG-20210614-WA0025

कोल्हापूरातील रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर भर द्या.

कोल्हापूर, दि. 14 जून :

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, गगनबावडा, शिरोळ तालुक्यामध्ये कोरोनाचा रुग्णदर अधिक असल्याचे दिसत आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या तालुक्यात मृत्यूदर अधिक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत. ताप, सर्दी, खोकला यासह अन्य काही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

टोपे म्हणाले, लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ही चांगली बाब आहे. महाआयुष ॲप, संजविनी अभियान जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, सहव्याधीग्रस्त रुग्णांवर अधिक लक्ष द्या. कोविड पश्चात आजार उद्भवू नयेत, याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे. संपर्कातील रुग्णांचा शोध घ्या. मृत्यूदराचे ऑडीट करुन घेऊन त्रूटी दूर करा. आरोग्य विषयक प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोल्हापूर मधील सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडच्या अनुषंगाने मतदार संघात आरोग्य विषयक सोयी सुविधांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या बाबींचा उहापोह करुन आभार व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *