दारुच्या होम डिलिव्हरीला ‘झिंगाट’ प्रतिसाद!
मुंबई, दि. ११ जुलै २०२०
घरपोच मद्य विक्रीस सरकारने परवानगी दिल्यापासून मद्यप्रेमींनी या संधीचा चांगलाच फायदा उठवल्याचे दिसते. घरीच बेत करण्याचा पर्याय मिळाल्याने अनेकांनी सुमडीतच झिंग झिंग झिंगाट करण्याचे बेत फत्ते केले. सरकारी आकडेवारीच सांगते १५ मे २०२० पासून १० जुलै २०२० या काळात ३१ लाख ५५ हजार ८१३ ग्राहकांनी होम डिलिव्हीचा फायदा घेत घरातच ‘चियर्स’ केले. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ग्राहकांची संख्या २८ हजार ६८३ आहे, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हि माहिती दिली.
घाऊक विक्रेत्यांकडून मद्यखरेदी करून त्याची विक्री करण्याची परवानगी परवानाधारकांना मिळावी अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली होती. सध्या उद्योगक्षेत्रावरील आर्थिक अडचणी व रोजगार टिकविण्याच्या दृष्टीने कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुढील आदेशापर्यंत घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे राज्यातील सुमारे १५२०० परवानाधारक व त्यावर अवलंबित सुमारे १ लाख मनुष्यबळास मोठा दिलासा मिळणार आहे.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०७९१ किरकोळ मद्य विक्री परवानाधारकांपैकी ७९३३ दुकाने सुरू आहेत.राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात दि.१५-०५-२०२० पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या काळात १ लाख ४३ हजार ६५६ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख ३८ हजार ४९७ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/ निरीक्षक / दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.
