‘सारथी’चे कामकाज राजर्षींच्या नावाला साजेसे व गौरव वाढवणारे हवे!
पुणे, दि. ११ जुलै २०२०
मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेसा, त्यांचा गौरव वाढवणारा असला पाहिजे. त्यासाठी ‘सारथी’ने भविष्याचा वेध घेऊन प्रकल्प तयार करावेत, ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२०-३० तयार करुन पुढच्या दहा वर्षांचा आराखडा तयार करावा. संस्थेचे काम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबरोबरच शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’ संस्थेत आयोजित विशेष बैठकीत दिला.
‘सारथी’ला कायमस्वरुपी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ‘सारथी’ संस्थेची जबाबदारी नियोजन विभागाकडे घेण्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथील ‘सारथी’च्या कार्यालयाला भेट दिली व अधिकाऱ्यांशी संवाद साधून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी आदरांजली वाहिली.यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, संचालक उमाकांत दांगट, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी ‘सारथी’च्या कामाला योग्य दिशा व गती देण्यासाठी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मराठा विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्थापन ही संस्था चांगली चालली पाहिजे. संस्थेच्या कामात त्रूटी राहता कामा नयेत, कारभारात पादर्शकता असली पाहिजे. संस्थेच्या निधीबाबतची माहिती वेबसाईटवर वेळच्यावेळी उपलब्ध झाली पाहिजे. युवकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच कौशल्यविकासावर भर द्यावा. गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन नवीन प्रकल्प तयार करावेत असे सांगून जुन्या प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
