मराठा आरक्षणावर दिल्ली दरबार आणि संसदेतच मार्ग निघू शकतो !
मराठा आरक्षणावर दिल्ली दरबार आणि संसदेतच मार्ग निघू शकतो !
मुंबई, दि. ४ जून :
मराठा आरक्षणावर तिन्ही पक्ष एकाच भूमिकेत आहेत. कुणाचीही वेगवेगळी भूमिका नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यामध्ये दुमतही नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पाटील पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सर्व काम ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आले आहे. ते याबाबतीत कायदेशीर सल्ला घेणं, योग्य ती पावले टाकणे याविषयी मंत्रीमंडळातील सदस्यांशी सल्लामसलत करून अंतिमदृष्टया कार्यवाही करत असतात त्यामुळे मराठा आरक्षणावर आवश्यक व योग्य ते विधान अशोक चव्हाणच करतील.
मराठा समाजाने आरक्षण मिळावे म्हणून मोठं आंदोलन केले आहे पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात मराठा समाजा विरोधात निर्णय लागलेला आहे. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी दिल्ली दरबारातच आणि संसदेत यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विचार केला पाहिजे व वेळ दिला पाहिजे असे मत जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
