आता पुणे शहरातही ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’
आता पुणे शहरातही ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’
पुणे, दि. ३१ मे :
पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हडपसर येथे पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.
हडपसर येथे सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करतो आहोत, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थिती बेसावध राहून चालणार नाही, राज्य शासनानेही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना देत आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
