सोलापूरच्या दोन तरुण सरपंचांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक !
सोलापूरच्या दोन तरुण सरपंचांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक !
आता गरज ‘कोरोनामुक्त गाव’ करण्याची.
सोलापूर, दि. ३१ मे :
कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्राने एक आदर्श घालून दिला असून माझे कुटुंब माझी जबाबदारी, सारखे उपक्रम राबवत कोरोनावर मात करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. सरकारी यंत्रणा बरोबरच काही संस्था व वयैक्तिक पातळीवर ही या लढाईत योगदान दिले जात आहे. यात सोलापूर जिल्ह्यात दोन तरुण सरपंचांनी केलेल्या कामाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत कोरोना लढ्यातील त्यांच्या कामाचे कौतुक केले.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच कोमल करपे व मोहोळ तालुक्यातील घाटणेचे सरपंच ऋतुराज देशमुख या दोन युवा सरपंचांनी आपापली गावं कोरोनामुक्त करून आदर्श घालून दिला आहे. या दोघांचा आदर्श महाराष्ट्रातील इतर सरपंचांनी घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, हिवरेबाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे
आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे.
सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल.
अंत्रोळीच्या २१ वर्षाच्या कोमल करपे यांचे शिक्षण बीएस्सीपर्यंत झाले आहे. गावात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला त्यानंतर करपे यांनी गावात १० खाटांचे कोविड केअर सेंटर उभे केले, उपचार करून गाव कोरोनामुक्त केले. तर ऋतुराज देशमुख यांनीही टेस्टिंग, ट्रेसिंगद्वारे कोरोना रुग्णांचा शोध घेऊन गावातच विलगीकरण कक्ष व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले.
या तरुण सरपंचांप्रमाणे सर्व गावांनी काम केले तर कोरोनामुक्त गाव होण्यास नक्कीच होऊ शकेल.
