मुंबईतील प्रस्तावित वाहतूक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा.
मुंबईतील प्रस्तावित वाहतूक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा.
मुंबई, दि. 24 मे :
मुंबई शहरातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने शिवडी-वरळी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉइंट-कफ परेड कनेक्टरसारखे प्रकल्प फार महत्वाचे ठरणार आहेत. दोन्ही द्रुतगती महामार्गावरील पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकसारखे उपक्रम पर्यावरणपुरक आहेत. या विविध प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, एमएमआरडीएने पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे अॅक्सेस कंट्रोल, तसेच पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकचे काम हाती घेतले आहे, यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल. सुशोभीकरणामुळे महामार्गावरील प्रवासाचा अनुभव अधिक सुखद होईल. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वेगवान प्रवासाला चालना देण्यासाठी वरळी-शिवडी कनेक्टर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. यामुळे कोस्टल रोड व एमटीएचएलसुद्धा जोडले जातील. प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टरच्या माध्यमातून शहरातील बँकिंग आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मच्छिमारांची कोणतीही गैरसोय होणार नाही याचा विचार करुन हा प्रकल्प आखला जात आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्राचा विकास गतिमान करणारे हे सर्व प्रकल्प आहेत. एमटीएचएलचे काम वेगात सुरू आहे. त्याच पद्धतीने वरळी-शिवडी कनेक्टरचे कामही वेगाने करण्यात येईल. शहरातून जाणाऱ्या दोन्ही द्रुतगती मार्गावरील सायकल ट्रॅकचा प्रकल्पही महत्वाचा असून एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी आणि ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत संपूर्ण सहयोग देण्यात येईल.
मुंबई महानगर क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला.
कल्याण आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोडींवर अत्यंत प्रभावशाली उपाय ठरणाऱ्या कल्याण रिंग रोड, दुर्गाडी ब्रीज या कामांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रकल्प, वरळी-शिवडी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर, कल्याण रिंग रोड प्रकल्प या प्रकल्पांचे सादरीकरण झाले आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
