सोलापूरच्या कोरोना स्थितीचा पालकमंत्र्यानी घेतला आढावा !
सोलापूरच्या कोरोना स्थितीचा पालकमंत्र्यानी घेतला आढावा !
सोलापूर, दि. 22 मे :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालय माने सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून लहान मुलांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 13 लहान मुलांचे दवाखाने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये 240 बेडची तात्पुरती सोय केली आहे. सोलापूर शहरात 16 दवाखाने अधिग्रहित करून यामध्ये 409 बेडची सोय करण्यात आली आहे अशी माहिती देऊन सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑक्सिजनचे बेड देऊन कोरोनाग्रस्त लहान मुलांची सोय करा अशा सूचना पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिल्या आहेत .
लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करावी. रूग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका. शासनाकडे जादा मागणी नोंदवून रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा. जिल्ह्यात 132 म्युकर मायकोसिस रूग्णांपैकी 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 120 रूग्ण उपचार घेत असून 30 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. यामध्ये चार रूग्ण कोविड असून बाकीचे नॉन कोविड आहेत. यामुळे नागरिकांनी कोविड झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज आहे. या रूग्णांकरिता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार घेता येणार आहेत, या योजनेच्या रूग्णालयांची बैठक घेऊन त्यांच्या शंका दूर करा.
ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पेट्रोलिंग, कारवाया वाढविल्या पाहिजेत. पोलिसांना साखर कारखाने, बाजार समित्या यांची वाहने उपलब्ध करून द्याव्यात. उपप्रादेशिक परिवहन विभागाने अतिरिक्त माल भरणारी जड वाहतूक तपासणीसाठी नाके वाढवावेत. वाढीव बिलांच्या अजूनही नागरिकांच्या तक्रारी येत असून डॉक्टरांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे. नातेवाईकांनी डॉक्टरांकडून पक्के बील घ्यावे. रूग्णालयांनी शासकीय दरपत्रक सक्तीने लावून घ्यावे. सलमान खान यांच्या बिईंग ह्युमन संस्थेने 25 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर दिले असून जिल्ह्यातील आणि बाहेरील सामाजिक संस्था, उद्योग यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचनाही भरणे यांनी केल्या.
जिल्ह्यात 15871 रूग्ण उपचार घेत असून जिल्ह्याचा मृत्यूदर, रूग्णसंख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करा. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर, शिल्लक बेड, कोणत्या ठिकाणी रूग्ण आहेत, याचीही माहिती भरणे यांनी घेऊन सूचना केल्या.
लसीकरणाबाबत सर्वांनी सतर्क राहून काम करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आतापर्यंत जिल्ह्याला चार लाख 98 हजार 510 डोस प्राप्त झाले. यामध्ये 16 हजार 580 कोव्हॅक्सिन आणि चार लाख 81 हजार 930 कोविशिल्डची लस मिळाली आहे. हेल्थ केअर वर्कर पहिला डोस 100 टक्के झाला असून फ्रंट लाईनरसाठी 39894 डोस दिले. 45 वर्षांवरील एक लाख 44 हजार 576, 60 वर्षांवरील एक लाख 43 हजार 345, 18 ते 44 वर्षांखालील 16 हजार 177 जणांना पहिल्या डोसचे लसीकरण केले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या 52 टीम आहेत. या टीममधील डॉक्टरांद्वारे गावोगावी लहान मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.
स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. लहान मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा, औषधे देण्यात येणार आहेत. त्यांच्या रक्ताची तपासणी करण्याचेही नियोजन केले आहे.
श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेट्रोलिंग करण्यात येणार असून संस्थात्मक विलगीकरण, संसर्ग वाढविणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे.
डॉ. जाधव यांनी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती मांडली तर डॉ. ढेले यांनी म्युकर मायकोसिसवर आतापर्यंत 349 इंजेक्शन प्राप्त झाल्याचे सांगितले. हे इंजेक्शनचा वापर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शासकीय रूग्णालयात लागतील तेवढे ठेवून बाकीचे खाजगी दवाखान्यांना वाटप करण्यात येत आहे.
