राज्यात चक्रीवादळामुळे 46 लाख ग्राहकांवर परिणाम !
राज्यात चक्रीवादळामुळे 46 लाख ग्राहकांवर परिणाम !
मुंबई, दि. 18 मे :
‘तौक्ते’ चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 6040 गावातील वीजपुरवठा आज संध्याकाळ पर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे अशी माहिती ऊर्जा नितीन राऊत यांनी दिली.
ऊर्जा मंत्री पुढे म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 85 हजार 519 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. पालघर जिल्ह्यात 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, संध्याकाळपर्यंत जवळपास 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता संध्याकाळपर्यंत जवळपास 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, संध्याकाळपर्यंत जवळपास 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. नाशिक जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
राज्यात शेकडो पोल पडले, तारा तुटल्या व जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधाऱ्या रात्री तिमिराची तमा न बाळगता व रात्रभर जागून नागरिकांना सेवा दिली तसेच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने 13 हजार तंत्रज्ञांची फौज मैदानात उतरवली आहे. ज्यामध्ये स्वतःचे 9 हजारहुन अधिक तसेच कंत्राटी पध्दतीवर कार्यरत 4 हजारहून अधिक इतके मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यरत आहे.
