नागपुरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सुरु !
नागपुरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सुरु !
नागपूर दि. १४ मे :
मुंबई पाठोपाठ नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन (लसीकरण) ला सुरुवात करण्यात आली आहे. बेडची उपलब्धता, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा करणारा नागपूर जिल्हा या उपक्रमातही अग्रेसर असून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मनपाचे कौतुक केले.
डॉ. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सुचनेनुसार हे ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. आज नागपूर शहरातील बैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये साठ वर्षांवरील जेष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते सुरुवात झाली.
नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाही, जे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत. किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे.अशा 60 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते.
या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे जेष्ठ नागरिक स्वतःचे वाहन, दुचाकी चालवू शकतात, त्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहे, तथापि ही सुविधा केवळ 60 वर्षावरील असाह्य ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
सध्या नागपूर शहरांमध्ये बेड,ऑक्सिजन,रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने लढली जात आहे. पुढील काळातील नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून दर चार तासाने प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काळात ही लाट नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधाचे पालन करावे. गरज नसेल तर घराबाहेर निघूच नये. लसीकरण पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडणे आपल्या सोबत इतरांना धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होणे आवश्यक असून शंभर टक्के लसीकरण हे सध्या एकमेव उद्दिष्ट आहे, असे आवाहनही डॉ.राऊत यांनी केले.
