दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या.
दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या.
मुंबई, दि. १३ मे :
राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्याविषयी माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत लसीकरणावर भर देण्यात आला. राज्यात किमान २० ते २२ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्याची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवरही उपलब्ध आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने वस्तुस्थिती समजून घेताना राज्याला जेवढ्या डोसेसची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थितपणे नियोजन करावे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातून लस दिली जाते. त्यासाठी राज्याच्या गरजेप्रमाणे लस पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तातडीने केंद्र शासनाने २० लाख डोस उपलब्ध करून द्यावेत.
परदेशातून लस आयात करण्यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय धोरण तयार झाल्यास त्याचा फायदा राज्यांना होईल. सध्या अन्य राज्यांकडून जागतिक निविदा काढल्या जात आहेत. परदेशातील लस उत्पादकांकडून राज्यांना वेगवेगळे दर दिले जात आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये स्पर्धा न होता केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे, अशी मागणी केल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यात सध्या सक्रीय रुग्ण संख्या कमी होत असून राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी (०.८) आहे. देशाचा रुग्ण वाढीचा दर दीड टक्के असून ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक लागतो. रुग्ण बरो होण्याचे प्रमाण वाढत असून राज्याचा रिकव्हरी रेट ८० वरून ८८ टक्के झाल्याचे टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्राची परिस्थिती सुधारित असल्याचा उल्लेख करीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले.
महाराष्ट्रात प्रति दशलक्ष २ लाख ४० हजार कोरोना निदान चाचण्या केल्या जात असून त्यामध्ये उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत असल्याने अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे टोपे यांनी सांगितले.
