मोदींनी आंतरराष्ट्रीय मदतीतही महाराष्ट्राला डावलले !

0
20201127_190001

मोदींनी आंतरराष्ट्रीय मदतीतही महाराष्ट्राला डावलले !

भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावे.

मुंबई, दि. ७ मे २०२१:
नरेंद्र मोदी सरकार कोरोनाच्या संकटात मदत करतानाही महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोनाकाळात ४० देशांनी केलेल्या मदत वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्राला डावलले आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले आणि वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र वगळून भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, बिहार व अन्य राज्यांना मदत दिली. केंद्र सरकारच्या या कृतीचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून राज्यातील भाजपा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, जवळपास २५ विमानांनी अनेक देशांतून भारताला मदत आली आहे. या देशांमधील अनेक भारतीय वंशाच्या लोकांना भारतातील आपापल्या राज्यांना मदत करावयाची असेल. सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे पीएम केअर फंडाप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे तसेच संघराज्य पध्दतीला छेद देणारेही आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे. सुरुवातीला कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरवण्यात भेदभाव केला, त्यानंतर रेमडेसीवीर, ऑक्सीजन तसेच लस पुरवठा करण्यातही दुजाभाव केला आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे, असेही सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *