मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल अनपेक्षित आणि निराश करणारा !
मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल अनपेक्षित आणि निराश करणारा !
मुंबई, दि. 5 मे :
मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले, भाजप सरकारने दिलेल्या विधितज्ञांच्या जोडीने विद्यमान सरकारनेही नामवंत व अभ्यासू वकील दिले होते, त्यांनी अपेक्षित सर्व दाखले, कागदपत्रे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, असे असतांनाही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निकाल अनपेक्षित आणि निराश करणारा आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना थोरात म्हणाले की, ‘देशातील अनेक राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे, असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारबाबत असा निर्णय देणे अनाकलनीय आहे. मराठा समाजात या निकालाने निर्माण झालेली अन्यायाची भावना दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करेल. मराठा समाजाच्या जोडीने न्यायासाठी संघर्ष करेल, याची खात्री देतो.
महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी एकत्रितपणे आजवर मराठा आरक्षणाचा लढा लढला आहे. यापुढेही ही लढाई आपल्याला एकत्र येऊनच लढायची आहे, विरोधी पक्षांना माझे आवाहन आहे, आपण चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करू नये.मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवा. लोकशाही मार्गाने आपण आपले न्याय हक्क नक्की मिळवू. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून पुढील योग्य दिशा ठरवेल. मराठा समाजाच्या विकासासाठी शर्थीचे प्रयत्न आम्ही करू, असेही थोरात म्हणाले.
