‘राजगृहा’चा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही!

0
राजगृह दादर

मुंबई, दि. ८ जुलै २०२०

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक ‘राजगृह’च्या तोडफोडीचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश पोलीसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, ही घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम राखावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन केले आहे.

महसूल मंत्री तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. “राजगृह हे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान आहे. आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या घटनेचा निषेध केला असून “परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे, नागरिकांच्या भावना राजगृहाशी जोडलेल्या आहेत. या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध”. असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *