पुनावालांना धमकी देणारांची माहिती आमच्याकडे !
पुनावालांना धमकी देणारांची माहिती आमच्याकडे !
मुंबई, दि. 3 मे :
सीरमचे अदर पुनावाला यांच्या धमकीचे प्रकरण सध्या तापले असून यावरून राजकीय आरोपांच्या फैरीही झडत आहेत. काँग्रेसने पुनावाला यांच्या धमकी चा मुद्दा उचलून धरत न मागता केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा कशी पुरवली आणि धमकी कोणी दिली याचा खुलासा करावा अशी मागणी केली असता भाजपाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
यावर बोलताना भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, “केंद्राने आपलं काम चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यात गैर काय? यावर राजकारण करायचं नाही.
कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे.
धमकी प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं” असा गर्भित इशाराही शेलार यांनी दिला.
नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाहीत. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही.” ‘माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद’ अशी टीका शेलार यांनी केली.
