१२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात ‘खावटी’ची रक्कम जमा !
१२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात ‘खावटी’ अनुदानाची रक्कम जमा !
मुंबई, दि. १ एप्रिल :
आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाला. दुरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी, आमदार सुनील भुसारा, आमदार विनोद निकोले, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, शासन सर्व सामर्थ्यानिशी काम करत आहे. सरकार सत्तेत आल्यावर सुरुवात चांगली झाली. मात्र नंतर करोनाचे संकट आले. आपण खूप काही चांगल्या योजना संकल्पना राबविण्याचे निश्चित केले होते. करोनामुळे याला मर्यादा आल्या. कोरोनाचे संकट अजूनही सुरुच आहे उलट ते अधिक वाढले आहे. यामुळे जगण्यावर काही निर्बंध आले, त्याचा परिणाम म्हणून अर्थचक्र मंदावले, रोजी रोटीवर परिणाम झाला. याचे दुष्परिणाम शहराबरोबरच ग्रामीण आणि आदिवासी भागातही होत आहेत. आदिवासी कुटूंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. ऑनलाईन पद्धतीने आज एकाचवेळी १२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
आपण शहरी भागात आरोग्य सुविधा निर्माण केल्या पण दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा कशी आहे हे पाहण्यासाठी मी मुद्दाम काही महिन्यांपूर्वी नंदूरबारला गेलो. तिथे ही अतिशय शिस्तीने ज्येष्ठ आदिवासी नागरिक लस घेतांना दिसले, आपल्याला शहरात करोना नियमांचे पालन करण्यास सांगावे लागते, जनजागृती करावी लागते परंतू आदिवासी बांधव हे नियम काटेकोरपणे पाळतांना दिसले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यालाही मी भेट दिली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर असो, चंद्रपूर असो, नंदूरबार असो हा सगळा भाग जंगलात वसला आहे. येथे निसर्ग सौंदर्य आहे, आदिवासींजवळ जगाला भुरळ पाडणारी स्वत:ची कला आणि संस्कृती आहे. याचा उपयोग करून आदिवासी भागाचा विकास का करू नये याचा विचार केला आणि त्याअनुषंगाने आपण या भागात विकासाची पावले टाकत आहोत. इथल्या पर्यटनाला चालना देत आहोत. या शासनाने आदिवासी
बांधवांचा विकास करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून आदिवासींना त्यांच्या पायावर भक्कपणे उभे करून स्वावलंबी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
