नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा.
मुंबई, दि. १ एप्रिल :
गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या या मंगलप्रसंगी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी सर्व श्रमिक बंधू भगिनींनाही शुभेच्छा व्यक्त केल्या.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, राज्यनिर्मितीच्या आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर विभूतींचे आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
ते म्हणाले की, कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. २२ एप्रिलपर्यंत सुमारे १ कोटी ३७ लाख लोकांचे लसीकरण करुन महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. राज्याच्या विनंतीवरुन केंद्र शासनामार्फत हाफकिन संस्थेस नुकतीच लस उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उत्पादीत होणारा ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी १०० टक्के राखीव ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. अतिरिक्त प्राणवायुची उपलब्धता करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने रेल्वेची विशेष ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे ध्वजारोहण केले. राज्यपालांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
