महाराष्ट्राचा ऑक्सीजन, रेमडेसीवीरचा पुरवठा वाढवा !

0
IMG_20210313_082419

महाराष्ट्राचा ऑक्सीजन, रेमडेसीवीरचा पुरवठा वाढवा !

मुंबई, दि. २३ एप्रिल :
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरचा पुरेशा पुरवठ्याची गरज आहे. राज्याला रुग्ण संख्येनुसार रेमडेसीवीरचा पुरवठा व्हावा. रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठा नियमित होत राहील याकडे लक्ष द्यावे. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता लसी आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवता येऊ शकते का यावर केंद्र सरकारने मार्गदर्शन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रभावीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीसीद्वारे चर्चा केली. यावेळी राज्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून राज्यात ७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स व २५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दररोज १५५० मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रीक टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे. आपण रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाकडे आपण १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटीलेटर्स मागणी केली आहे.

महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे मिळत आहेत.
राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे ६.५ लाख डोस उपलब्ध होते. महाराष्ट्र राज्य लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक. लसीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी.
महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ही ५ कोटी ७१ लाख असून त्यासाठी लसीकरणासाठी १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. देशातील लस उत्पादक एव्हढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने पुरवठा करू शकणार नाहीत. खासगी कॉपोरेटसना सीएसआरच्या माध्यमातून उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *