रेमडेसिविरसह कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्या !

0
20210422_132157

रेमडेसिविरसह कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्या !

मुंबई, २२ एप्रिल :
भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या १०० वर्षात आलं नसावं. हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे. अशावेळी रेमडेसीविर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार आहे. हे वाचून धक्काच बसला. रेमडेसिविर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्रानं स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय? वास्तविक दिसतंय असं की त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणं ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असं असताना केंद्रानं रेमडेसीविरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी राज्यांकडे सोपवावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, संपूर्ण देशात कोरोनानं हाहा:कार माजवला आहे. दिवसेंदिवस रूग्णांचे आकडे वाढत आहेत. काल तर देशात रूग्णसंख्येनं ३ लाखाचा आकडा मागे टाकला. मृत्यूचे आकडेही चिंताजनक आहेत. प्रेतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकी राज्यातलीही दृश्यं पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे. राजकारणाची मुळीच नाही. आत्ता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.

आरोग्यसेवेची यंत्रणा संपूर्णपणे कोसळली आहे. कोरोनाबाबतच्या चाचण्या पुरेशा गतीनं होत नाहीत, रूग्णालयात पुरेशा खाटा नाहीत, उपचारासाठी आवश्यक रेमडेसिविर आणि इतर साधनं उपलब्ध नाहीत, अत्यंत गरजेचा असा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत नाही. लसीकरण आपण खुलं केलं तर आहे परंतु त्यासाठी योग्य संख्येनं पुरवठा होईल की नाही ह्याची खात्री नाही. आपण ह्या साथरोगाबाबतीतलं व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभं करण्याची गरज आहे.
कोरोनाविरूध्दच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. ह्यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा. अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये. ह्यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्याकडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे असं दिसतं.

कोरोनाविरूध्दची ही लढाई मोठी आहे. तिथे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीनं उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पध्दतीचा आत्माही तोच आहे. मला आशा आहे की आपण माझ्या ह्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल अणि राज्य सरकारांना ह्या बाबतीतील प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *