किराणा दुकान आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच चालू !
किराणा दुकान आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत चालू !
मुंबई, दि. 19 एप्रिल:
कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने राज्य सरकारने १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावले आहेत मात्र निर्बंध लागू असतानाही अनेक लोक किराणा खरेदीच्या नावावर विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे. ही गर्दी कमी होत नसल्याने आता किराणा दुकानांची वेळच फक्त सकाळी ७ ते ११ अशी चार तास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
करोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
