ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेची मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही.

0
20201129_210404

ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेची मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही.

पंढरपूर, दि. १४ एप्रिल :
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सध्याच्या राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेची नीटशी कल्पना नाही. त्यामुळे पूर्वीच्या काळातील राजे जसे वेषांतर करुन राज्याची स्थिती पाहायचे तसेच मुख्यमंत्र्यांनीही पीपीई किट्स घालून राज्याची पाहणी केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था पाहायला मिळेल अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पंढरपूर येथे प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबईची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. आम्हाला या लॉकडाऊनमध्ये कुठेही राजकारण करायचे नाही. आम्ही या लॉकडाऊनमध्ये सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. पण आता मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण स्थिती समजू शकेल, त्यामुळे त्यांनी राज्यात फिरावे व राज्यातील विदारक स्थिती समजावून घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सध्याचे मुख्यमंत्री फक्त एका पक्षाचेच प्रमुख होऊ शकतात. शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री बनविले व स्वत: सरकारच्या बाहेर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ब-याच गोष्टी माहित नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांनी ऑक्सिजन हे विमानाने आणण्याबाबत काल भाष्य केले असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था सरकारला करावी लागेल. ऑक्सिजन असो वा रेमडेसिवार इंजेक्शन किंवा वेंटिलेटर असू दे जोपर्यंत मुख्यमंत्री स्वत: पीपीई किट घालून बाहेर फिरत नाहीत तोपर्यंत नेमके काय सुरु आहे हे मुख्यमंत्र्यांना कळणार नाही.

गेली १८ ते १९ महिने राज्यामध्ये केवळ राजकारणच सुरु आहे. समाजकारण हा विषयच नाही. गेली काहि महिने आम्ही सातत्याने मागणी केल्यानंतर काल सरकारने पॅकेज जाहिर केल्याचे सांगतानाच पाटील यांनी स्पष्ट केले की, मोफत धान्य वाटपाची केलेली घोषणा अतिशय फसवी आहे. सध्या एका कुटुंबाला ३५ किलो धान्य १०५ रुपयांमध्ये मिळत आहे. ते १०५ रुपयांचे धान्य मोफत देणार व त्याच्या बदल्यात सरकार १०५ रुपये भरणार हा सगळा सावळा गोंधळ सुरु आहे अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यात लसीचा तुटवडा नाही. फक्त लसीच्या विषयावरून राजकारण सुरु आहे. लस काळा बाजार करुन विकण्यात आली. त्यामुळे लसीबाबत एकदा श्वेतपत्रिका जाहिर करावी. केंद्राकडून किती लसी आल्या. ४५ वय वर्षेवरील किती जणांनी लसी दिल्या, ६० वय वर्षेवरील माणसे किती. कोविड योध्दे किती. हे समजले पाहिजे. कारण लसीसाठी जे पात्र नाहीत असे सत्ताधारी पक्षाचे काही नेते व पदाधिका-यांनी लस देण्यात आल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *