‘अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते’ हे डॉ. आंबेडकरांचे शब्द खरे ठरत आहेत !
‘अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते’ हे डॉ. आंबेडकरांचे शब्द खरे ठरत आहेत !
मुंबई, दि. १४ एप्रिल :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे परंतु आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्यकारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग वाढला आहे. सरकारच्या विरोधात बोलले की चौकशी लावली जाते. आंदोलन केले तर बदनाम केले जाते. भाजपा-आरएसएस हे समाजात विद्वेषाचे बिज पेरून धर्माच्या, जातीच्या नावावर फूट पाडण्याचे काम करत आहेत. आता लोकशाही व संविधान रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. “अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आज खरे ठरत आहेत, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जून खरगे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले होते. यावेळी खरगे बोलत होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाचे विचार एकच असून समाजातील दलित, आदिवासी, शोषीत समाज व महिलांच्या कल्याणासाठी काम करण्याचा हा विचार आहे. आंबेडकरांचा पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही भिन्न पक्ष होते पण त्यांची विचारधारा मात्र समान होती. समाजातील शोषीत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे परंतु रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधानाचे रक्षण करु असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.
