एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो !
एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो !
अजित पवारांकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा.
मुंबई, दि. १३ एप्रिल :
वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘देवगिरी’ निवास स्थानी गुढी उभारुन सहकुटुंब पूजन केले.
मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला गुढी पाडव्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय आणि मराठी संस्कृतीत गुढी पाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुचं आगमन होतं. झाडांची सुकी पानं गळून पडतात. नवीन पालवी फुटते. निसर्गातील या आशादायी बदलांचे उत्साहाने स्वागत करण्याचा हा सण आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सामुहिकपणे साजरा करता येत नसला तरी, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन यंदा गुढीपाडवा साधेपणाने साजरा करुया. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा निर्धार करुया अशा शब्दात राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
