राज्यात कोरोनाची गंभीर व भयावह स्थिती;वास्तव नाकारून चालणार नाही !
राज्यात कोरोनाची गंभीर व भयावह स्थिती;वास्तव नाकारून चालणार नाही !
मुंबई दि. ८ एप्रिल :
कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने…सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जिवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्यसरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे असे कळकळीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेला केले.
शरद पवार यांनी गेल्यावर्षी आणि यावर्षीची कोरोनाची सद्यस्थितीतील आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली. त्यामध्ये गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये कोरोना सक्रिय रुग्ण ३४ हजार २५९ होते तर यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ७९ हजार २६८ इतके आहेत. तर ठाणे – सप्टेंबर – २०२० – ३८, ३७८, एप्रिल – २०२१ – ६१, १२७, पूणे – सप्टेंबर – २०२० – ८२, १७२, एप्रिल २०२१ – ८४,३०९, नाशिक – सप्टेंबर – २०२० – १६, ५५४, एप्रिल – २०२१ – ३१, ६८८, औरंगाबाद – सप्टेंबर – २०२० – १० हजार ५८, एप्रिल – २०२१ – २७, ८२१, नागपूर – सप्टेंबर – २०२० – २१,७४६, एप्रिल – २०२१ – ५७, ३७२ आदी. एवढी गंभीर व भयावह स्थिती यापूर्वी देशातील कुठल्याही राज्यात अशी कधी नव्हती. सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय ही चिंताजनक बाब आहे, असेही शरद पवार म्हणाले.
राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करुन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. रुग्णांसाठी बेड्स, वैद्यकीय उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे नाईलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यसरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. आता पर्याय राहिलेला नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारचासुध्दा यासाठी आग्रह आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोरपणाची पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्रसुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे असे सांगतानाच कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या कमतरता आहे याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्रसरकार व आरोग्य खातं पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील सरकारच्याही पाठिशी आहे. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
बंधने आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे. व्यवसाय, दुकाने बंद झाल्याने व्यापारी वर्गाचं नुकसान झाले आहे. फळभाज्यासारख्या नाशवंत शेतीमाल तयार करणार्या शेतकऱ्याला आपल्या मालाचं करायचं काय? विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर्गाचे देखील अपरिमित नुकसान होत आहे. या सगळ्यातून पुढे जात आहोत परंतु पुढे जात असताना यातून यशाचा मार्ग काढायचा असेल, यश सिध्दीला न्यायचं असेल तर या सगळ्या स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे असेही शरद पवार म्हणाले.
या परिस्थितीला सामोरं जात असताना जे काही मार्गदर्शन, ज्या काही उपाययोजना यासंबंधीच्या सूचना आलेल्या आहेत. त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय घ्यावे लागत आहेत. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मनापासून मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता आपल्या सगळ्यांना व प्रसारमाध्यमांना, राजकीय नेत्यांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या घटकांना विनंती आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विचार करुन या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यसरकारचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळाले पाहिजे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस व सगळे घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण एकजुटीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करेल याबाबत शंका नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.
