रक्त संकलनासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा आगळा वेगळा संकल्प !
रक्त संकलनासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा आगळा वेगळा संकल्प !
मुंबई, दि. 4 एप्रिल:
राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी व रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. इच्छूक रक्तदात्यांच्या सोसायटीच्या आवारात सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या सहभागाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल आणि डिस्टंसचे पालन करत राहत्या सोसायटीच्या आवारातच रक्तदान करता येईल, अशी माहिती ट्रस्टी राजाराम देशमुख यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना देशमुख म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटातच राज्यात पुन्हा एकदा अभूतपूर्व असा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील हाॅस्पिटलस् व रक्तपेढ्यांमध्ये पुढील चार-पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. महाविकास आघाडी सरकारने व सत्ताधारी तिंन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रक्तदाना बाबत केलेल्या अहवानानुसार रक्तसाठा भरून काढण्यासाठी व रक्ताअभावी कोणत्याही जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
इच्छूक रक्तदात्यांच्या घराच्या जवळ रक्त संकलन व्हॅन पोहचले व राहत्या सोसायटीच्या आवारातच रक्तदान करता येईल. मुंबई मध्ये राहणा-या ज्या रक्तदात्यांना रक्तदान करावयाचे आहे त्यांनी आपले नाव सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या आधिकृत दूरध्वनी क्रमांक …
022-24224438
022-24223206
या क्रमांकावर सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00 या वेळेत नोदवावे.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि म्हणूनच सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा विश्वस्त व न्यासाच्या आरोग्य कमिटीचा सदस्य या नात्याने सामाजिक भान जोपासणा-यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून आपले सामाजिक भान जोपासण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विश्वस्त राजाराम देशमुख यांनी केले आहे.
