पंढरपूरमध्ये भगीरथ भालके विरूद्ध समाधान औताडे यांच्यात थेट सामना!
पंढरपूरमध्ये भगीरथ भालके विरूद्ध समाधान औताडे यांच्यात थेट सामना !
पंढरपूर, दि. २९ मार्च :
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार भारत भालके यांचा मुलगा भगीरथ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तर भारतीय जनता पक्षाने समाधान औताडे यांना उमेदवारी दिलेली आहे. या दोघांमध्येच ही लढत होत आहे.
पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
पंढरपूर मतदारसंघातून ते नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच भगीरथ भालके यांना जयंत पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने त्या आपली उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत भाजपचे समाधान औताडे विरूद्ध महाविकास आघाडीचे भगीरथ भालके अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर मतदारसंघात १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून, निकाल २ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. ३० मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
