नाही तर नाईलाजाने पुणे जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ !

0
IMG-20200916-WA0046

नाही तर नाईलाजाने पुणे जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ !
पुणे, दि. 27 मार्च :
पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ बाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देऊन कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी नियम कडक पाळावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजन युक्त बेड आदी आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा.  लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांना त्रास होवू नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचनाही पवार यांनी केल्या.

कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी सीओईपी जम्बो हॉस्पिटल मधील बेडची संख्या आवश्यकतेनुसार 800 पर्यंत वाढवून हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु करा. पिंपरी चिंचवड मधील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करा. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याची कार्यवाही करा, असे सांगून ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील  लसीकरण केंद्रे 316 वरुन 600 पर्यंत वाढवण्यात येतील. यासाठी आवश्यक त्या प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दहावी, बारावी व एमपीएससीच्या परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार होतील. तथापि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येत आहेत. इयत्ता दहावी व बारावी वगळून शाळा, महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येतील.

लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत व अंत्यसंस्कार 20 व्यक्तींच्या उपस्थितीतच करण्यात यावेत. सार्वजनिक, राजकीय, खाजगी कार्यक्रमांना बंदी राहील, यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी सुरु राहतील. येत्या काळात येणारे होळी व अन्य सण समारंभ घरगुती स्वरुपात साजरे करुन नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *